Tuesday 8 February 2022

सिन्नर शहराचा इतिहास

 *ऐतिहासिक सिन्नर*


सिन्नरला ऐतिहासिक वारसा आहे  . त्याच्या खुणा इथली मंदिरे, चौदा चौकाचा वाडा,  गाववेशींवरून मिळतो. सिन्नर हे प्रगत नगर असल्याने येथे नाशिकच्या आधी नगरपालिका स्थापन झाली होती.  इतिहासाचे अभ्यासक डाॅ. व्ही. पी. बिरारी यांनी " १५०० वर्षापूर्वीचे सिन्नर " या लेखातून ताम्रपाषाण कालीन संस्कृतीचे काळातील सिन्नरचे स्थान स्पष्ट केले आहे  . सिन्नरचे ' स्वपूर ' असे एक ग्रामनाम असल्याचे ते म्हणतात. चालुक्य काळात सिन्नर हे लष्करी ठाणे असल्याचे ते म्हणतात. सिन्नर या ग्रामनामाची व्युतपत्ती ते सिंद - सिंदीनगर- सिंदीनेर- सिन्नर अशी मांडतात.  सिन्नर हा शब्द अपभ्रंश होऊन तयार झाला आहे . चालुक्यांच्या नंतर राष्ट्रकुट घराण्याची सत्ता ( इ.स. ७४७ ते १०५० ) असल्याचे काळात सिन्नरमध्ये गोंदेश्वर मंदिराची उभारणी झाली. या मंदिराचे खरे नाव गोविंदेश्वर असे होते.  गोविंद या राजाला हे मंदिर राष्ट्रकुटांनी समर्पित केले होते . गोंदेश्वर हे नाव गोविंदेश्वराचा अपभ्रंश होऊन तयार झाले आहे . हे मंदिर शिवपंचायतन असून त्याच्या भोवती उत्तरेस नारायण ( विष्णू ) व गणपती आणि दक्षिणेस सूर्य व महाशक्ती  ( पार्वती ) ही मंदिरे असून मध्यस्थानी शिवाचे मुख्य मंदिर आहे. या मंदिरांचे श्रेय यादव राजवटीला दिले जात असले तरी यादव घराण्यातील राजे हे चालुक्यांचे व राष्ट्रकुटांचे प्रथम मांडलिक राजे होते. त्यानंतर त्यांनी चालुक्यांना बाजूला सारून सत्ता स्थापन केली  . यादवांच्या काळातच सिन्नरची राजधानी देवगिरीला हलविण्यात आली. इ.स. 


८५० ते ११८६ पर्यंत म्हणजे सव्वातिनशे वर्ष सिन्नरवर यादव राजांची सत्ता होती. यादव काळात सिन्नरला राजकीय व प्रशासकीय राजधानीचा दर्जा होता. लष्करी ठाणे असल्याने लष्करी धामधूम  , सैन्य , तोफा, बंदूका सिन्नरने पाहिल्या. चलनातील नाणी आणि टांकसाळी पाहिल्या. इतिहास अभ्यासकांना विविध चांदी, सोन्याची नाणी सापडली असून ती सेऊणचंद्र, भिल्लमदेव , सिंघनदेव,  महादेव, रामदेव यांच्या काळातली आहेत. कारण त्यावर राजाच्या नावाचा उल्लेख आढळतो. सिन्नर नगराने नृत्य , गायन, वादन अनुभवले . कला , संस्कृती, धर्मजागरण यांची समृध्दी असणारे सिन्नर हे प्राचीन नगर होते.  ( पहा- १५०० वर्षापूर्वीचे सिन्नर लेखक डाॅ व्ही पी बिरारी समाविष्ट सिन्नर ऐतिहासिक व सांस्कृतिक यथादर्शन ) 


        मध्ययुगीन काळात सिन्नर अहमदनगर सीमेवर  औंढा - पट्टा हे किल्ले १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले गेले  . तो बहामनी काळ होता. निजामशाहीत अहमदनगर हे राज्य होते. त्यावर मलिक अंबर याची हुकुमत होती.  मलिक अंबरच्या कारकीर्दीत सिन्नर अहमदनगर राज्याचा भाग असल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांवरून दिसून येते  . औढा- पट्टा किल्ल्यावर मोगलांची नजर होती. मोरोपंत पिंगळे यांनी हे किल्ले काबीज केल्यावर पुन्हा मोगलांनी ते हस्तगत केले तरी मोरोपंत पिगळ्यांनी ते परत मिळविले. ते सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील सरदार होते.  १६७५ नंतर औंढा - पट्टा हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. पट्टा किल्ला अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ विश्रांती घेतल्याने त्याला विश्रामगड असे म्हणतात. सिन्नर हे ठाणे मराठ्यांच्या ताब्यात होते. वावीचे राजेभोसले हे थेट शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.  सिन्नरच्या देशमुखांचे पूर्वज कुवर बहादूर हे महत्त्वाचे पुरूष असल्याचे दिसून येते . त्यांनी इ.स. १७२४ , इ.स.१७२७ आणि इ.स. १७३१ च्या लढाईत भाग घेतल्याचे दिसून येते . डुबेर ही पहिले बाजीराव पेशवे यांची जन्मभूमी असून पेशव्याचे सिन्नर नगरीशी नातेसंबध असल्याचे दिसून येते. सिन्नर हे ऐतिहासिक नगर असल्याने ते देशमुख वतनदारांचे नगर होते असे दिसते.  इथल्या देशमुखांचे आडनाव काळे आहे . काही देशमुख काळे आडनाव लावताना दिसून येतात. सिन्नर हे संपन्न नगर असल्याने फ्रेंच कागदपत्रात सिन्नरला लिटील पुणे म्हटले आहे .